डोळ्यांच्या कॅमेरातून

मंदिराच्या गार अंधारल्या गाभार्‍यात तिने पाऊल टाकलं.
तिच्या पैंजणाचा घुंगरु हलकेच निनादून शांत झाला..
केसातल्या मोगर्‍याची दरवळ उठली.
हातातला सोनचाफा घरंगळला, अंदाजाने खाली वाकून तिने फूल शोधलं
हातातल्या फुलाच्या ताटात पुन्हा ठेवलं. एक एक पाऊल टाकत पुढे आली.
पुजार्‍याच्या चेहर्‍यावर स्मित आलं.
देवासमोरील समईच्या मिणमिण उजेडात तिने ते ओळखीचं स्मित टिपलं. 
"बाळ, रजस्वला असताना आलीस, तुला आराम घ्यायला हवा, पोट दुखते ना"
"आता बरं आहे बाबा. आईला जरा ताप आहे, म्हणून मी फुलं खूडली. ही घ्या.."
ती आली तशी वळलीही..
घुंगराचा आवाज दूर जात राहिला...
बापाने श्रद्धेने फुलं चढवली.
गाभाराभर घमघमाट झाला.
आज त्याला दगडी डोळयांत अपरंपार नितळपणा दिसला.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments