Thursday, 28 January 2016

सौदा

देशील का मला एक स्वच्छ लखलखीत दिवस?
ज्याच्या पाठीवर ओझं नाही
ज्याच्या पोटात ओझं नाही
असा मोकळा ढाकळा दिवस?

नितळ सूर्यकिरण हातात
हातावर सोनेरी वर्ख
जे जे स्पर्शावं, सोनं व्हावं
असा लकाकता परीस

कोवळं हास्य जन्मावेळचं
तसेच मिचमीच डोळे
नुकते उमलू लागलेले
व्यवहाराच्या पलीकडले

न दमणारे पाय
आणि भेगा नसलेलं मन
साद ऐकणारे कान
ओल्या काळीजाचं भान

देशील का फक्त एक दिवस?
पाठीवर ओझे नसलेला
पोटात ओझे नसलेला

बदल्यात माझ्या किती अस्वस्थ रात्री देऊ?

-बागेश्री

1 comment: