Thursday, 28 January 2016

हे अनय

मी जेव्हाही तुझ्याकडे आले
तू हा असा हात हातात घेतलास..

अनेकदा जेव्हा
मेंदीने रंगलेली माझी पावलं
यमुनेकाठी कान्हयाच्या
बासरीमागे
धावत गेली
आणि खुणेच्या
कंच आम्रमोहोराखाली
पोहोचूनही कान्हा
दिसला नाही तेव्हा
सैरभर होत घरी परतली..
अगदी त्याचवेळी
माझा घामेजला चेहरा
डोळ्यातलं हरवलेपण
टिपलं होतंस तू स्पष्टपणे
आणि काहीही न बोलता
नेहमीसारखं बेमालूम
वावरत राहिलास..
मी माझी कामं उरकत असता
"का छळ केला कान्हयाने आज असा?"
प्रश्नात
हजारदा बुडत, काठावर येत राहिले
मला एकच काम दोनदा सांगावं लागे
तेव्हा घरातल्यांचा रोष अंगावर घेऊन
माझी कामे निपटतना
सांग अनय
आणलंस कुठून इतकं शहाणपण,
मुरवलंस कुठे इतकं जगणं?
कसं सहन केलंस
माझं नसलेलं असलेपण?
आणि वाहिलीस संसाराची धुरा एकट्यानेच?
हा असा हात हातात घेऊन
न्याहाळत काय असतोस सांग ना?
हातावर ठळकपणे फक्त तुझी रेघ आहे
कुठलीच सावळी रेघ नाही
हे पाहून आनंदी होतोस!
अगदी तेव्हाच माझ्या डोळ्यांतला
तुझ्याबद्दलचा परकेपणा
कसा पचवून नेतोस?"
हात निरखत राहतोस..

सांग अनय,
का रडू दिलंस
आणि थोपटत राहिलास मला,
कान्हा गोकुळ सोडून
जाताना?
कान्ह्याचा तुझ्यावर
विश्वास होता की
तो परतून येणारच नाही, ह्यावर तुझा??
कसा वाटून घेतला हा मोठेपणा
तुम्ही दोघांनी?
ह्या मोठेपणाच्या
भरवशावर
संसार पार करतेय खरी
पण मनाची सारी गुजे यमुनामाईने
पोटात खोल दडवून घेतलीत...
सोड माझा हात
काढ तुझी नजर
प्रत्येक श्वासाशी होणारा
हा झगडा सोसवत नाही रे...

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...