स्मरण

राधे,
तू का नाही उचललेस
माझ्या परतीच्या वाटेवर
सांडलेले तुझे डोळे!
तू माझी सखी, आत्मज असताना
मी ज्या वाटेने निघून गेलो
तिला परतीचा रस्ता नाही
हे तुला ठाऊक होतं तरीही
का सारखी शोध घेत राहिलीस,
रेंगाळलीस
निघून गेलेल्या
पावलांच्या ठशांवर!

ज्याच्या सूरावर
गोकूळ लुब्ध मंत्रमुग्ध झालं
तीच बासरी
जाताना
तुझ्यापाशी सोडून
गेलो तेव्हा
अनेक संध्याकाळी
कुंजविहारात जाऊन
त्या बासरीतून न
उमटणा-या सुरांवर
विलक्षण पदन्यास
घेत राहिलीस राधिके
त्या पावलांची थरथर
माझ्या वक्षावर स्थिर
वैजयंतीने लक्ष लक्ष वेळा
अनुभवली आहे

स्वतःत मग्न होऊन
माझ्यात एकरूप
झालीस श्यामला
दोघांत अंतर उरले नाही
तेव्हा तेव्हा
माझ्या डोळ्यांच्या
काठांना आलेली
ओल मी
कुणाच्याही नकळत
निपटून काढली आहे

मी माझ्या कर्मात
व्यस्त असताना
तुझे विस्मरण
कणभरासाठीही
होत नाही
तुझ्या ह्याच विश्वासावर
तरून जातो
सहोदरे
तरून जातो

-बागेश्री

Post a Comment

0 Comments