तुझ्या अंगणीचा ऋतू

तुझे चांदण्याचे हात
माझे सुने अवकाश
तुझ्या उरामध्ये वारा
मला रेशमाचे पाश

तुझे गाव मनोहर
माडा माडातली वाट
माझ्या गावातून जाते
कोरडीशी पायवाट

तुझ्या नावाचे वलय
लाल घडीच्या पायऱ्या
माझे घरटे चिऊचे
कुणी सगा न सोयरा

तरी साद मी घालता
तुझ्या मनाच्या मातीला
तुझ्या अंगणीचा ऋतू
माझ्या अंगणात आला

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. तुझ्या-माझ्यात एक नात आहे...ते किती भावगर्भ आहे, हे बागेश्रीच्या शब्दांत साकार होताना तुझी संपन्नता आणि माझे रितेपण "चांदण्यांचे हात" आणि "सुने अवकाश" होतात....त्याचप्रमाणे, एकेक प्रतिमा ही कवयित्री सुंदर रांगोळी मांडावी, तशी मांडत जाते."वारा आणि पाश", 'माडा माडातली वाट आणि कोरडी पायवाट",'लाल घडीच्या पाय-या आणि सगा न सोयरा ...चिऊचे घरटे"....ह्या शब्दांचे सामर्थ्य केवळ अर्थान्वयी नसून चित्रकलेसारखे मन:पटलावर चित्र रेखाटणारे आहे.

    ReplyDelete