ओझे


आपल्या जन्मापासून, आपल्या डोईवर येतं एक ओ़झं. संस्काराचं, समाज नियमांच्या भितीचं, धर्म अधर्म, निती अनितीचं, इतकंच नाही तर, पुर्वजांच्या गुणसूत्रातून आपल्यात आलेल्या स्वभावाचं ओझं. बरेचदा तर आपल्या पुर्वसंचिताचंही, ओझं! 
                           वाहत राहतो आपण ते, आपल्याही नकळत. इतकं की जणू आपल्या अस्तित्वाचा तो एक भाग झाल्यागत.. जणू आपल्या डोक्याचा, मनाचा, संवेदनांचा, व्यक्तिमत्वाचा एक भाग होऊन गेलेले ते ओझे.

आयुष्याच्या डोंगर- द-या चढून उतरून जाणारे आपण, जणू सुर्य अस्ताला जाण्यापूर्वी निघालो आहोत आपल्या घरी. डोईवरची टोपली सांभाळत.  एखाद्या गावातून जाताना कुणी अनुभवी खुणावे आपल्याला, ज्याच्यापुढे आपण जरासे गुडघ्यात वाकताच त्याने अलवार हाताने उचलून उतरवावे डोईवरचे ओ़झे नि करावा भार हलका, पेलाभर पाणी देत म्हणावं "दमणूक झालीये ना, हो आता निर्भार" आपणही हलके- हलके होत, दीर्घ श्वास घेऊन अनुभवावी मोकळी अवस्था.

           वयाच्या कुठल्याश्या वळाणवर. येतो असाच एक प्रसंग. जो अलगदच उतरवतो डोईवरचं जन्मापासूनच ओझं आणि एकाएकी दाखवतो लख्खकन आरसा की बघ, तू समजतोस तो तू नाहीस. हा भार म्हणजे तू नाहीस. भाराखाली दबलेला एक स्वतंत्र व्यक्ती तू आहेस. हे ओ़झे इथवरच आणायचे होते. इथे तू निर्भार होऊन घराच्या दिशेने वाटचाल कर. एक नवी व्यक्ती होऊन कर. ओझे उतरवणारा तो क्षण अनुभवी असतो. त्याचं वय त्याच्या डोळ्यांत दिसतं. तो वर्षानुवर्षे अशी सा-यांची ओझी उतरवून घेत आला आहे. आपलंही पुर्वसंचिताचं ओझं आपण त्याच्याठायी द्यायचं असतं. नवं होऊन जायचं असतं. खरं होऊन जायचं असतं. आणि आता वळूनही पहायचं नाही. फक्त चालत रहायचं. सूर्यास्ताच्या आधी, आपण, आपण होऊन घर गाठायचं.

गोम कधी कधी इतकीच होते. की भाराची सवय होऊन गेलेली असते. भार उतरला तरी तो असल्याचा अविर्भाव जात नाही. पण त्या अनुभवी क्षणाच्या डोळ्यांत डोळा मिसळलेला प्रसंग आठवत रहायचा. ओझे उतरलेले आपसूक लक्षात येते. नव्याने स्वतःची ओळख आपल्या घराला सांगायला पावले झपाझप पडत राहतात.....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments