मी मी उर्फ सेल्फी

#Bookshelf #मीमीउर्फसेल्फी

पहिल्यांदा मला "आनंद विनायक जातेगांवकर" मागच्या वर्षी भेटले.... असेच. अनप्लॅन्ड. पुस्तकांच्या गर्दीतून."अस्वस्थ वर्तमान" नावाची त्यांची कादंबरी घरी आणली. त्याचं पाहिलं पान वाचलं आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्यावर जे गारुड केलंय ते आजवर मला उतरवायला जमलेलं नाही. सध्या मी त्यांचं शेवटचं पुस्तकं वाचतेय .... ज्याचं नाव आहे "मी मी उर्फ सेल्फी"

पृथ्वी गोल आहे, या खगोलशास्त्रीय सत्याला तडा जावा आणि नक्कीच पृथ्वीला कुठेतरी एक कोन आहे, जिथे उभे राहून जातेगांवकर आपल्याकडे, या जगाकडे, संपूर्ण मानवजातीकडे नि:पक्षपात बघत उभे आहेत असं मला वारंवार वाटतं. इतके त्रयस्थ होऊन लिहिणे, अशी परखड भाषा आणि ओघवते लेखन की कधी तुम्ही आत्मपरीक्षणाला भाग पडता कळत नाही...
आता ही जी, मी मी उर्फ सेल्फी, कादंबरी आहे, ती एका मुलीने लिहायला घेतलीय. जिला स्वतःचे नाव, गाव, पत्ता, ओळख सांगण्यात अजिबात स्वारस्य नाही. मुळात जातेगांवकरांनी साकारलेली ही कथेची नायिका असल्याने ती जगाकडे परखड नजरेने पाहतेय व प्रत्येकाला सोलून काढायलाच लेखणी घेऊन बसलेली आहे. तिची सुरुवात-  तिचं घर, कॉलेज, तिचा बाप यापासून सुरु झालेली असली तरी हळू हळू तिचा प्रवास एकटीचा ना उरता त्यात आपण अप्रत्यक्षपणे गोवले जातो. मग ती आपलं बोट धरून रशियातील हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन त्याची मुलगी स्वेतलाना, त्याची बायको, तिचा गूढ मृत्यू यातून प्रवास करता करता एकाएकी आपण महाभारतातले युद्ध बघत कुरुक्षेत्रावर उभे राहतो. तिथून काळ पुढे सरकतो. स्वातंत्र्यानंतरचे भारत- पाकिस्तान फाळणीतले कांड त्यातली कापाकापी उघड्या डोळ्याने पाहतो. या सगळ्यात आपल्याला साम्य वाटू लागते. साम्य नसणार कसे??? ही सगळी माणसंच होती ना! माणसं आणि त्यांचे राजकारण!
तिथून आपण कधी नकळत माऊंटबटन, गांधी, जिना, नेहरू यांच्या बाजूला उभे राहून त्यांना जवळून पाहू लागतो आपल्यालाही कळत नाही...  या लोकांच्या आयुष्य प्रवाहातून वाहत आपण आपल्याला येऊन भिडतो. त्या सगळ्यांशी जोडून आपण आपल्याच आयुष्याकडे पाहू लागतो. ही त्या लेखनाची ताकद आहे...

एक वेगळा अनुभव, स्वतःकडे परखडपणे पाहून स्वतःचा शोध ज्यांना घ्यावा वाटत असेल. त्यांनी जातेगांवकरांचा हा चष्मा आपल्या डोळ्यावर ठेवून पहावा. त्यातून जगही वेगळं दिसतं व आपणही. हा बॅक कॅमेराने काढलेला जगाचा असा एक फोटो आहे की, त्यातून शेवटी शेवटी सेल्फीचा आभास व्हायला लागतो!!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments