मी नववीत असताना आम्ही जालन्याला रहायचो, ही तेव्हाची गोष्ट!
आमच्या घरापासून गल्लीच्या त्या टोकापर्यंत चढ असल्याने सायकल हातातच घेऊन जावी लागायची... चढावर ढांग टाकली की उतारावरून हवा खात पलिकडे जायला जम्मत यायची. गल्लीतून चालत जाताना हमखास सोनियाच्या घरावरून जावे लागायचे. यावर्षी ती दहावीला होती आणि म्हणूनच सगळ्या बि-हाडांचे लक्ष तिच्या घराकडे होतं. त्याचं कारणही तसंच होतं. आजवर सोनिया कधी दुसरी आली नव्हती! इयत्ता पहिली ते नववी, कायम पहिला नंबर. १ मे ला तिचे बाबा जातीने घरोघरी जाऊन "आमची मुलगी काही पैला नंबर सोडत नै बघा. आता तर आम्ही आदल्या दिवशीच पेढे आणून टाकतो" यावर एखादे इब्लिस काका "अहो मग आदल्या दिवशी वाटूनही टाकायचे, किमान आम्हाला ताजे मिळतील ख्या ख्या ख्या.... !" असे म्हणून त्यांची मस्करी करायचे "बाकी मामा फरसाण वाल्याची मिठाई ना हो ही?" काका काही एक न बोलता पुढच्या घरी पेढे वाटपाला जायचे. तर अशी ही सोनिया या वर्षी दहावीला होती आणि गेल्या वर्षभरात तिला शाळा ट्युशन्ससाठी बाहेर पडलेले वगळल्यास विशेष कुणी पाहिले नव्हते. त्यांच्या घरात टिव्हीचे केबल काढून टाकण्यात आले होते. इमर्जन्सी बॅटरी सतत चार्ज करून ठेवण्यात आली होती. या वर्षी तर तिला तिच्या आई-वडिलांकडून आजारी पडण्याचीही मुभा नव्हती. आणि आता परिक्षा महिनाभरावर आल्याने तिच्या आई- बाबांचे बस्तान अक्षरशः ओसरीवर आले होते. आपण कधीही घरासमोरून जा. हे दोघे बाहेर. एकमेकांशीही बोलायचे नाहीत. आम्ही कोणी समोरून गेलो... "काय काकू कशा आहात" विचारताच अगदी हळू आवाजात खुसफूसत त्या "मी बरीय, तू अभ्यास करतेयस ना? आत बघ सोनिया कशी अभ्यास करतेय" यावर आमच्याकडे बोलायला काहीच नसल्याने "होsss" म्हणून सायकल पुढे रेटायचो..
आता आता काका- काकूंच्या हे लक्षात यायला लागले होते की, येता- जाता लोक आपल्यासोबत बोलतायत याने सोनिया डिस्टर्ब होऊ शकते. यावर तोडगा म्हणून दोघांनी वाचन सुरू केले. आता केव्हाही घरासमोरून जा- दोघे वाचनात दंग. इतके की समोर येऊन कुणी चौकशी केली तरी त्यांना ऐकू जायचे नाही.... तर अशा प्रकारे ते अख्खे घर दहावीला बसले होते.
एके रात्री कॉलनी गाढ झोपेत असताना, अचानक लोकांचे आवाज येऊ लागले. हळू हळू गलका वाढू लागला. आमच्या घरातली मंडळीही बाहेर धावली. सोनियाच्या बाबांना एकाएकी छातीत कळा सुरू झाल्याने सगळ्यांनी धावपळ करून त्यांना रातोरात अॅडमिट केले आणि दुस-या दिवशी सकाळी ते गेल्याची खबर आली. कॉलनीवर विचित्र शांतता पसरली. अनेक दिवसांनी सोनिया लोकांना दिसली. लोकांत मिसळली. पण रडून मोकळी झाली नाही! अबोलच राहिली. काकांचे दिवस घातले गेले. त्याच्या अगदी दुस-या दिवशीपासून काकू पुन्हा ओसरीवर. हातात पुस्तक. आत सोनिया. पुस्तकांत दिसेनाशी. बघता- बघता बोर्डाची परिक्षा आली. पेपर सुरू झाले. दररोजचा पेपर संपला की सोनिया यायच्या वेळी काकू दारात उभ्या. तिची प्रश्ननपत्रिका ताब्यात घ्यायच्या. सोनिया जेवून पुढच्या अभ्यासाला लागायची आणि काकू बाहेर बसून तिला किती मार्क्स पडू शकतील याचा अंदाज प्रश्नपत्रिकेवर मांडत बसायच्या.
परिक्षा संपली. सुट्टी पडली. कडाक्याच्या उन्हाने मंडळी आपापल्या घरात कोंडली गेली. सकाळी पाण्याचे टँकर येऊन उभे राहिले की कॉलनीला जाग असायची. दुपारी डेजर्ट कुलरच्या आवाजात कॉलनी घोरत पडायची. मराठवाड्यातल्या उन्हाळी संध्याकाळ फार रम्य असतात. दिवसभर तापलेला आसमंत हळू हळू गार होताना तापलेले जीवही शांत होतात. बाहेर पडतात. दिवसभराची मरगळ मागे सरते. गप्पाष्टके, पन्ह्याची देवाण- घेवाण सुरू होते.... असाच तो उन्हाळा सरला. शाळेचे निकाल लागले... कोणी फर्स्टक्लास कुणी ढक्कलपास झाले. जे जे दहावीला होते, त्या सगळ्या घरांचा मात्र सोनियाच्या निकालाकडे डोळा लागला. उन्हाची तीव्रता मागे पडली. एखाद दुसरा काळा ढग उगाच येऊन विरू लागला आणि बोर्डाच्या निकालाचा दिवस उजाडला. पुन्हा कोणी फर्स्टक्लास कुणी ढक्कलपास झाले........ सोनिया मात्र नापास झाली.
उभी कॉलनी हळहळली. तिचे दाखले देऊन मुलांना अभ्यासाला बसवणा-या पालकांकडे बोलायला शब्द उरले नाहीत. कुणी म्हटलं बाबा गेल्याचं तिने जिव्हारी लावून घेतलं. कुणी म्हटलं बोर्ड अवघड होतं यंदा. कुणी म्हंटल मुलांवर इतकं दडपण नसतं टाकायचं. कुणी काय कुणी काय. त्यावर्षी काका नव्हते, त्यावर्षी तिने पेढे खेचून आणले नाहीत. त्या संपूर्ण दिवसभर मात्र सोनियाच्या घराचा दरवाजा काही उघडला नाही...
-बागेश्री

0 Comments