कातरवेळ

संध्याकाळास "कातरवेळ" नाव ज्याने कुणी दिले असेल त्याला या वेळेचे मर्म किती अचूक समजलेय असा विचार येतो. कातर. मनाची अवस्था अगदी कातर करून टाकणारी वेळ. उगाच पडझड झालेली नाती आठवतात, नीट निरोप न घेता दुरावलेल्या व्यक्ती आठवतात, कुणी दूर असलेले या क्षणी सोबत असते तर, सोबत असलेल्यांना आपले मन कळते तर, निसटून गेलेले क्षण आठवतात, चुटपूट लागलेले प्रसंग आठवतात... मनातल्या हुरहूरीला  सांजेची फुंकर अधिकच चेतवत रहाते.... अंधारात दूर चकाकणा-या दिव्याची उगाच सोबत वाटू लागते. कुणाशी तरी वाटून घ्यावी ही वेळ असं वाटू लागतं. फोन मधली काँटँक्ट्स ची यादी आठवते. मनातल्या मनात सगळ्या नावांची उजळणी होते. कुणाशी बोलावे. कुणीतरी तिकडेही असाच आपला एकांत वाटून घेण्याची वाट पहात असेल का... एक विचार येतो. नजर स्थिरावत नाही कुठेच आणि स्थिरावलीच तर हटत नाही अजिबात. मनातला कल्लोळ बाहेरच्या निर्मम शांततेशी सांगड घालू पाहतो. मघाशी आपण कुणाला तरी कॉल करण्याच्या विचारात होतो... पण ही वेळा आपण मनापासून जगून का पहात नाही. का शोधतो मनाला रमवणारे ठिकाण... खरेतर या वेळी डोळे आतल्या दिशेने वळतात. आपली नजर आपलाच ठाव घेत असते.  त्या नजरेला उत्तर द्यायलाच घाबरतो आपण आणि मग स्वतःच्या मनाशी पाठशिवणीचा खेळ खेळू लागतो. ही वेळ अंतर्बाह्य जुळण्याची असते. आतला दिवा तेववण्याची असते. हाच तो काँटॅक्ट जो डायल करायचा आणि स्वतःशी हितगूज करत एकांत पिऊन टाकायचा..... कातरवेळ टाळायची नसते, जगून घ्यायची असते...
-बागेश्री  

Post a Comment

1 Comments

  1. आपल्या माणसाचं नसण सांगणाऱ्या कुंद कातर वेळा बऱ्याचदा हलवून सोडतात...

    ReplyDelete