माणसं सुटतात. हळूहळू, हळू - हळू, हळू - हळू. सुटतात. एकमेकांतून. एकमेकांपासून. सुटतात, मोकळी होतात आणि मग ती वेगळीच दिसू लागतात. आहेत तशी. स्वच्छ. काहीतरी अडकून पडलेले सुटल्यासारखी. मळभ दूर झाल्यासारखी. त्यांच्या आकाशात ती हवी तेव्हा झेपावू लागतात. इतके दिवस लागणारी "परवानगी" न मागता. आणि आता त्यांचे चित्तही फक्त त्यांचेपाशी असते. अशी माणसं फार आकर्षक वाटू लागतात. आत्मभान आलेली, ताजी- टवटवीत माणसं.. या टवटवीला वयाचं बंधन नाही.
जगता जगता कुणात तरी संपूर्णतः अडकून पडलेली, आपलं स्वातंत्र्य, आपल्या इच्छाही त्यालाच वापरू देणारी. आपल्याला आपलं असं काही न ठेवलेली. कुणी विचारल्यास, त्याच्यात/ तिच्यातच माझं सुख आहे म्हणणारी, दुस-याला समर्पित झालेली माणसं. आधी अनिच्छेने आणि मग अपरिहार्यपणे स्वतःला विसरून गेलेली. दुस-याच्या अवकाशात उडताना, हेच आपलं आकाश असे मानून उडताना आपले पंखच उधारीचे आहेत याचा विसर पडलेली माणसं! सुटतात कधी- ना- कधी. एक मोठा आवाज. एक मोठा आघात त्यांना जागं करत असतो. ते दु:ख करतात. कुठून कोसळले हे संकट आपल्यावर? साहजिक आहे. खोटे का असेनात, पंख होते ना जवळ? त्यांना होतं अतोनात दु:ख, आकाश हरपल्याचं, पंखांनी सोडून गेल्याचं..... पण काळ असतोच ना तरबेज. तो म्हणतो आता तरी डोळे उघड. तू पांघरलेली पट्टीही नेलीये बरं का त्या आघाताने. उघड डोळे स्वच्छ. वर बघ एकदा. डोक्यावर आकाश अजूनही. पण ते तुझं आहे. तुझ्या हक्काचं. आणि चाचपून पहा तू कधीही न उघडलेले तुझे खरेखुरे पंख. त्याला वारा दे. पाणी दे. जरा जरासा वेळ दे. येईल झेपावता..... काळ महा मुजोर. हटत नाही. ही जाणीव पेरल्याशिवाय अजिबात हटत नाही. ही जाणीव स्वतःत मुरवलेली टवटवीत माणसंच आपल्या नकळत जेव्हा म्हणू लागतात... मी सुटलोय. तेव्हा त्यांना कळत नसतं. कशातून ते? आणि आता ते न कळल्याने फारसा फरकही पडत नसतो....
-बागेश्री
0 Comments