मन उधाण वार्‍याचे...!

सांजावलेल्या ढगांवर उमटलेला,
निलगिरीचा शेंडा...

ती झुलणारी काळसर पानं
पाहताना,
माझ्यातले दोष
जणू गळून पडले.....सारे!
क्षणांत हलकं झालं
मन..... चित्त!

आज जडत्वाला सारून
शरिराचाही, तरंगण्याचा आग्रह....!
मनाचा चंचलपणा
कसला आलाय साधायला?
मन तर कधीच परागंदा....वार्‍यासवे!
सांजेच्या रंगात
मनसोक्त उनाडत राहिलं,
माखत राहिलं...

उरला आनंद...!
दु:ख, अश्रू तर कधी नव्हतेच जणू..
आता, फक्त आनंद.. निखळसा!
साठलेला,
हक्काने झिरपू पाहणारा!

पण;
अलवार भान आलंच,
स्थळा- काळाचं!

रंग तिथेच सोडून
पायउतार झालेल्या,
निरभ्र मनाचा हात- हातात घेऊन
मीही... परतीच्या वाटेवर....

कित्तीतरी दिवसांनी- आज,
माझ्यातल्या "मला" सोबत घेउन..!

-बागेश्री

Post a Comment

3 Comments

  1. नमस्कार
    अतिशय हळुवार पणे कविता उलगडली आहे.
    राजू

    ReplyDelete