रात्र

शांत मनातला कोलाहल ऐकण्यासाठी रात्रच हवी.
एक कौमार्य जपलेली रात्र!
तिने तिच्या भाळावरचा अर्धचंद्र उतरवून ठेवावा
डोळ्यांत भरावं अंधाराचं काजळ आणि पडून रहावी तळ्याकाठी!
आपला रापलेला हात हातात घेऊन, बुडवावा गार पाण्यात आणि न दिसलेले तरंग जाणवून घ्यावेत, खोलवर..
तिचा पडलेला उच्छवास आपण अंगावर घ्यावा आणि कळून यावं की, आपल्यासोबत कुणी जगतंय!
चढ़ती रात्र- गोठत आलेल्या जाणिवा, आपली आपल्याला नवी ओळख करून देतील आणि आपण रात्रीशीच सलगी करू पाहू तेव्हा ती देईल सा-या ताकदीने ढकलून दूर!
भाळी पुन्हा चढवेल चंद्रकोर, पुसेल बेदरकारपणे अंधारलं काजळ आणि त्या तळ्यातच मारेल सूर.. !
तेव्हा एक वीज लखलखून जाईल अन येईल समजून..
तिचा सहवास फ़क्त आतवर मुरवायचा असतो
जगण्याचा अर्थ तिच्या मदतीने उलगडायचा असतो.
ती सोबत असते पण कुणाचीच नसते!
.......मनातला कोलाहल ऐकण्यासाठी येते एक कौमार्य जपलेली रात्र!
-बागेश्री

Post a Comment

1 Comments