डोह गहिरे होत जातात

दोघेही थांबतात
एकमेकांच्या काठाशी येऊन
डोहांतलं गहिरेपण ठाऊक असतं आणि
बुडी मारल्यानंतर परतीचा मार्ग नको होईल
हे जाणत असतात..
जाणतात हे ही
की नंतर
निथळता प्राण घेऊन वावरावं लागेल
देहाची ओल क्षणिक
वारा लागता संपणारी
पण
आतली ओल मुरेल
डोळ्यांना पालवी फुटेल

..मग काय काय लपवणार?

सरतात मागे ते
काठ दिसेनासे होतात
दोन डोह आणखी
गहिरे होत जातात

-बागेश्री

Post a Comment

5 Comments

  1. प्रेम ही भावना अशीच आहे की जिच्या डोहात बुडी मारल्या नंतर एक प्रकारचे रितेपण येत जाते, कारण दोघांतल्या 'मी'चं विसर्जन झाल्यानंतर उरते एक निरव,नितळ आणि पारदर्शी अस्पृश्यता....म्हणून बागेश्री, सार्थपणे म्हणते."बुडी मारल्यानंतर परतीचा मार्ग नको होईल" बुडी मारणे म्हणजे स्वत:ला, स्वत:च्या मी-पणाला मारणे आहे.पण जर बुडी अयशस्वी झाली तर "निथळता प्राण घेऊन वावरावं लागेल"....प्रेमातील देह संभावना बागेश्री म्हणते "देहाची ओल क्षणिक...वर लागता संपणारी..."क्षण भंगुरता हा देहाचा धर्म आहे.हा धर्म "आतली ओल मुरेल (मुरवेल), डोळ्यांना पालवी फुटेल" देहाच बीज देहात मुरु लागल्यावर "मग काय काय लपवणार?" अंतरी फुलणारा अंकुर मातृत्वाला, प्रेमाच्या देही संस्कारांना कसा लपविणार?म्हणून मग ते प्रेमाचे देही चटके सोसत "मागे सरतात ते"...एकत्र न येण्यासाठी..."काठ दिसेनासे होतात" पण त्यांच्या अंतरयामीचे बंध..."दोन डोह आणखी गहिरे होत जातात"... जुळलेले प्रेमबंध मात्र तसेच लोंबकळत राहतात.....आपापले गहिरेपण आयुष्यभर पेलत राहतात...भौतिकाचे बंध तोडले (दोघेही थांबतात....) तरी आधिभौतिकाचे पाश घट्ट तसेच राहतात...गहिरेपण गहन होत जाते...ही कविता नाहीयेय, ही एक व्यवहार्य जाणीवेच्या परिप्रेक्षात न फुलणा-या प्रेमाची कथा आहे...ज्या व्यवहारी जाणीवेत प्रेमाची नेणीवता...हे एक धगधगते वास्तव आहे. बागेश्रीने ते परखडपणे पण सहृदयतेने मांडताना poetic justice देण्याचा मोह टाळला आहे, जरी तो कवीचा बाणा असतो.....

    ReplyDelete
  2. poetic justice देण्याचा मोह टाळला आहे>> काका, फार योग्य गोष्ट पकडलीत. ह्यावर विचार करते आहे. उत्स्फूर्त व्यक्त होताना गद्याकडे वळते, हा माझ्या लिखाणाचा गुणधर्म आहे. मला वाटतं ह्यावर मी अभ्यासपूर्ण चिंतन करायला हवं आहे

    ReplyDelete
  3. त्याच असं आहे, बागेश्री...poetic justice नाकारताना स्वत:ला तू नाकारलेलं नाहीस. ह्याचाच अर्थ असा की बागेश्री ही कवियत्री स्वत: काव्यात्म न्याय मानणारी व्यक्ती आहे...पण रिल्के म्हणतो, त्याप्रमाणे, "निर्मितीचा क्षण हा मातृत्वक्षण असतो;" त्याला जन्म देताना तुझ्यातील बागेश्री लोप पावत असते...बागेश्री ही व्यक्ती, स्त्री-पुरुष...अशी कोणीही राहत नाही....ती एक अभिव्यक्ती होऊन जाते....त्या क्षणाची ती केवळ माता असते.रिल्के पुढे काय म्हणतो,ते बघ,"सूक्ष्मांचे तपशील अंतर्धान पावत असतानाच स्थूलाची लक्षणे दृग्गोच्चार होऊ लागतात".काव्य निर्मिती असो गद्य निर्मिती असो,हा प्रवास सूक्ष्मातून सुरु होतो, अज्ञात, अगोचर आणि गूढ अशा संवेदना ...ही सूक्ष्माची सुरवात असते.त्या संवेदनाच्या साधनेतच मग स्थुल म्हणजे शब्दांचे आकार, आकृती दिसू लागतात... सुक्ष्माला अर्थपूर्ण, आशयघन अस्तित्व देण्यासाठी स्थूलात यावे लागते....तिथे बागेश्री अभिव्यक्तीत्वातून म्हणजे सुक्ष्माकडून परत स्थुलाकडे म्हणजे व्यक्तीत्वाकडे येत असते.

    ReplyDelete
  4. हो, ह्यावरून मला माझ्याच कथेत मी लेखकाच्या तोंडी दिलेला संवाद आठवला

    ReplyDelete
  5. कोणती कथा?मी वाचली नाहीयेय ना?तुझ्या ब्लॉग वर कथा नाहीयेत ना?मला वाचायला देशील का? आणि कशी देणार?

    ReplyDelete