उघड्या पाठ्यपुस्तकावर,
दोन थेंब..
सरसरून आलेला वारा,
बाहेर मैदानावर हलका शिडकावा,
सरींचा एक फिरलेला हात अन् चौफेर मृद्गंध.. !!
तास संपल्याची घंटा आणि 
खो- खो च्या खांबाशी गलका..
काही मिनिटांत रंगलेला खेळ        
मिळालेला खो    
अडकलेला पाय
फुटलेला गुडघा... आणि मी बाद!
दूर लिंबाच्या झाडाखाली उभी राहून
आता मी त्यांचा खेळ निरखत असलेली..  
गार वार्यावर उडणारे फ्राॅक
धावण्याची लगबग
बसलेल्यांची सतर्कता
भुरभूर उडणारे केस कानामागे सारण्याची घाई..
पावसाचं समाधान मात्र झालेलं नसतं..
आभाळ दाटतंच जात
वारा भरारात राहतो
धुळीचा पडदा हां हां म्हणता व्यापून उरतो..
खो खो लोपतो
झाडही...!
मधे अनेक वर्ष सरलीत
आज डोक्यावर वय पिकल्याची झाक आहे..
खिडकीतून वारा धडक आत शिरतोय,
मुजोर पावसाचे थेंबही घरात
कॉफीची गरम वाफ सुखावतेय
बाहेर कॉलनीत
लहानग्या जागेत .. खो- खो रंगलाय
आणि आत,
उघड्या पाठ्यपुस्तकावर दोन थेंब...
चला,
उद्या शाळेत शिकवण्याचा धडा वाचून ठेवला पाहिजे!
-बागेश्री
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
1 Comments
मस्त... रोमांचक... Keep it up
ReplyDelete