ऑबजर्व्हर आला की बिहेवियर बदलते. निरिक्षक आला की वागणूक बदलते. आपण आपले काम करत असतो. तसे तल्लीनही असतो. खोल तल्लीन. पण आपले चलाख पंचेंद्रिय जागरूक असतात. मग्न मेंदूच्या कुठल्याशा पेशीला कळतं आपल्याकडे कुणीतरी बघतंय. आपण सजग होऊन आजूबाजूला पहातो. कोण बघतंय टिपतो. त्या क्षणापासून आपली काम करण्याची पद्धत बदलते. जे काम आपण पूर्वी करत होतो, ते तसेच आता करत नाही. करण्याची पद्धत बदलते. मग आपण चालत असू, वाचत असू, विणत असू, स्वयंपाक करत असू, पाठांतर, गाणी गात नाचत असू. आपण बदलतो.
जर म्हटलं. पक्षी, पानं फुलंही असंच करतात तर. पण करतात खरे. चाळा म्हणून तुम्ही करून पहा वाटल्यास. शांत बसलेल्या पानांकडे बघत रहायचे एकटक. ते डोलतात. आपल्याकडे कुणी बघतंय म्हटलं की डुलून घेतात. त्यांची आधीची वागणूक बदलते. सकाळी चालता- चालता मी हा प्रयोग अनेकवेळा केला. मला छान प्रतिसाद मिळाला. ज्या झाडांच्या पानांकडे थांबून पहात राहिले त्यांनी डुलून घेतलं. गुलमोहर, लिंब, बिट्ट्याचं झाड, कमीला भरती बाभळीही डोलली. नाही म्हणायला सदाफुलीही हासली. मग पुढे चालता- चालता चाफा आला. बघतेय. बघतेय. एकटक बघतेय. इतरांनी जिथे कुणीतरी पाहतेय याची नोंद घेऊन डुलून दाखवायला एक मिनिट घेतला, तिथे चाफ्याला दोन, नाही तीन नाही पाच मिनिटे न्याहाळाले, पण ऊहूं. चाफा हलेना, बोलेना की डुलेना. मला मग उगाच गाणं आठवलं... चाफा खंत करी काही केल्या फुलेना! ते गुणगूणत मी निघाले पुढे. नाहीतर काय? रुसून घट्ट मुट्ट होऊन बसलेल्याला नजरेने तरी किती आळवायचं. उगाच नाही कवी बी यांनी लिहिलं असणार हे. नाहीच जुमानत तो....
मग मी तो चाळा सोडला आणि जरा मॉर्निंग वॉककडे लक्ष दिलं... मन मात्र चाफ्यात अडकलं. का चार- चौघांसारखा नाही तो. का कुणी बघत राहिलंय तरी फरक नसेल पडला त्याला... तो आपल्यात तल्लीन. पुरेपूर. आपल्याला जमलं पाहिजे तसं. नाहीतर आपल्या हातात एक काम असताना आपण दुस-याकडे तरी बघत राहतो. नाहीतर हाती घेतलेलं ते एक काम करताना सत्तर वेळेस मोबाईल तरी उचलून पाहतो. शेवटी "जन विषयाचे किडे, त्यांची धाव बाह्याकडे" हेच घडतं आपल्या बाबतीत. आपण बाहेर बाहेर वावरतो, आत जात नाही. स्वत:शी जोडण्याइतके तल्लीन होत नाही. त्या तल्लीनतेत खरंतर केवढी ताकद आहे. मनाची पोकळी भरून काढण्याची. आपण शोधत असतो वेळ सत्कारणी लावण्याच्या तिनशे त्रैहात्तर क्लृप्त्या. पण कधीच कसं कळलं नाही. आत्ता या क्षणी आपल्या हातात जे काम आहे त्यात पुरेपूर झोकून द्यायचं, कुणी का बघत असेना आपल्याला. आपण आपल्या "असण्यात" तल्लीन असावं झालं. म्हणजे होतं काय की आपण फक्त तेव्हा त्या क्षणात असतो. बाकी कुठेही नाही. आणि हीच नाहीये का जगण्याची खरीखुरी कला... मी चालता चालता पुन्हा चाफ्याशी येऊन पोचले होते आणि तो पु-या ब्रह्मांडातलं निरागस हसत होता. जणू या हृदयीचे त्या हृदयी झाले. दोघांनाही या जगात आपण "असण्याचे" मर्म कळाले. मीही आडमुठेपणा न दाखवता या कानाचे त्या कानापर्यंत ऐसपैस हसले आणि त्यालाच गाऊन दाखवलं... "चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी चाफा, कोठे दोघेजण रे......."
-बागेश्री
0 Comments